04/06/2026
“ऑरगॅनिक” हा शब्दच आपल्या समाजाच्या अपयशाचं प्रतीक आहे
आज आपल्या समाजामध्ये इतकी विचित्र आणि लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे की जो शेतकरी खरंच शुद्ध, नैसर्गिक, विषमुक्त अन्न पिकवतो, त्यालाच वेगळं छापावं लागतं की “हे ऑरगॅनिक आहे”, “यामध्ये केमिकल नाही”, “रेसिड्यू फ्री आहे”, “विषमुक्त आहे”.
जरा विचार करा.
हे छापण्याची गरज का पडते?
कारण बाजारातील उरलेल्या अन्नाबद्दल आपण आपोआप गृहित धरायला लागलो आहोत की त्यामध्ये रासायनिक फवारण्या झालेल्या आहेत, कीटकनाशकांचे अवशेष आहेत, कृत्रिम पद्धती वापरलेल्या आहेत आणि दीर्घकाळात शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
पूर्वी अन्न म्हणजे अन्न होतं.
कोणालाही वेगळं सांगावं लागत नव्हतं की हे विषमुक्त आहे. कारण नैसर्गिक अन्न हीच सामान्य गोष्ट होती.
आज परिस्थिती पूर्ण उलटी झाली आहे.
विषारी पद्धती “स्टँडर्ड प्रॅक्टिस” बनल्या आहेत आणि विषमुक्त अन्न ही “स्पेशल कॅटेगरी” झाली आहे.
हीच खरी शोकांतिका आहे.
आज बाजारामध्ये मिळणाऱ्या अनेक भाज्या, फळे आणि धान्य चमकदार दिसतात. एकसारख्या आकाराचे टोमॅटो, डाग नसलेली वांगी, मेण लावल्यासारखी सफरचंद, एकदम पिवळी केळी. ग्राहकांना तेच आवडतं.
पण कुणी विचारत नाही की हे इतकं “परफेक्ट” दिसण्यासाठी किती फवारण्या झाल्या असतील? किती केमिकल्स वापरले गेले असतील?
जर एखाद्या भाजीवर थोडा डाग असेल, थोडी कीड लागलेली दिसली, आकार छोटा असेल, रंग कमी चमकदार असेल, तर लगेच लोक म्हणतात “हे खराब आहे.”
पण वास्तव उलट असू शकतं.
निसर्गामध्ये थोडीफार कीड दिसणे म्हणजे ती परिसंस्था अजून जिवंत आहे याची खूण असते.
आज आपण अशी अवस्था निर्माण केली आहे की किडीसुद्धा ज्याला खायला धजावत नाही, ते आपण मात्र पैसे देऊन आनंदाने खातो.
शेतकऱ्याला सतत सांगितलं जातं की उत्पादन चमकदार पाहिजे, मोठं पाहिजे, डागविरहित पाहिजे, शेल्फ लाइफ जास्त पाहिजे. मग हे साध्य करण्यासाठी रासायनिक खतं, कीटकनाशके, फंगीसाईड, वॅक्स कोटिंग, कृत्रिम पिकवणी अशी संपूर्ण रसायनांची साखळी वापरली जाते.
आणि त्यानंतर जेव्हा एखादा शेतकरी नैसर्गिक शेती करून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यालाच प्रश्न विचारले जातात.
“डायरेक्ट विक्री करता? मग स्वस्त द्या.”
“मध्ये एजंट नाहीत ना? मग डिस्काउंट किती?”
म्हणजे ग्राहकाचा मुख्य प्रश्न हा नसतो की अन्न सुरक्षित आहे का.
मुख्य प्रश्न असतो, “किती स्वस्त?”
लोकांना मोबाईलसाठी जास्त पैसे द्यायला चालतात. गाडीसाठी प्रीमियम चालतो. कपड्यांसाठी ब्रँड चालतो. पण अन्न मात्र शक्य तितकं स्वस्त हवं असतं.
कोणी विचारत नाही की:
“माझ्या मुलांच्या शरीरात कमी विष जाणार आहे का?”
“माती टिकते आहे का?”
“पाणी वाचतं आहे का?”
“हा शेतकरी स्वतः विषाच्या संपर्कात कमी येतो आहे का?”
आज “ऑरगॅनिक” हा शब्द मार्केटिंगपेक्षा समाजाच्या अपयशाचं प्रमाणपत्र जास्त वाटतो.
खरं पाहिलं तर व्यवस्था उलटी असायला हवी होती.
आज विषमुक्त अन्नावर “ऑरगॅनिक” छापलं जातं. पण प्रत्यक्षात केमिकल वापरलेल्या उत्पादनांवर मोठ्या अक्षरात इशारा छापला गेला पाहिजे:
“या पिकावर रासायनिक फवारण्या झालेल्या आहेत.”
“कीटकनाशकांचे अवशेष असू शकतात.”
“लहान मुलांपासून दूर ठेवा.”
“दीर्घकाळ सेवन आरोग्यास घातक ठरू शकते.”
जसं आज डास मारायच्या स्प्रेवर, बेगॉन, हिट किंवा इतर विषारी उत्पादनांवर लिहिलेलं असतं:
“Poison”
“Keep Away From Children”
तसंच अनेक कृषी रसायनांच्या बाटल्यांवर कवटीचं चिन्ह असतं. PPE किट वापरा, मास्क घाला, हातमोजे घाला, शरीरावर लागू देऊ नका, असं स्पष्ट लिहिलेलं असतं.
कारण कंपन्यांनाही माहिती असतं की ते पदार्थ विषारी आहेत.
पण सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे तीच रसायने फवारलेलं अन्न मात्र कोणत्याही इशाऱ्याशिवाय बाजारात विकलं जातं.
ज्या शेतकऱ्याला फवारणी करताना मास्क घालायला सांगितलं जातं, त्याच फवारणीतील अवशेष शेवटी ग्राहकाच्या ताटात पोहोचतात.
ही गोष्ट आपण इतक्या वर्षांत इतकी सामान्य मानायला लागलो आहोत की आता कुणालाच त्यात काही विचित्र वाटत नाही.
आज लोक चव, पौष्टिकता आणि आरोग्यापेक्षा चमक, रंग आणि आकार बघतात.
नैसर्गिकतेपेक्षा “परफेक्शन” महत्त्वाचं झालं आहे.
पण निसर्गामध्ये परफेक्ट दिसणाऱ्या गोष्टी क्वचित असतात.
औद्योगिक उत्पादनं परफेक्ट दिसतात.
निसर्ग जिवंत दिसतो.
आणि कदाचित म्हणूनच आजची खरी गरज “ऑरगॅनिक” हा शब्द विकण्याची नाही, तर लोकांची अन्नाकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची आहे.
कारण शेवटी स्वस्त अन्नाची किंमत कुठेतरी भरली जातेच.
कधी माती भरते.
कधी पाणी भरतं.
कधी शेतकरी भरतो.
आणि शेवटी शरीर भरतं.
*मुक्तक जोशी*
"छ. संभाजीनगर.*